पिंपरी-चिंचवड: निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण दुर्घटनेत दोन तरुण कामगारांचा मृत्यू झाला. अमोल शिंदे (वय २०) आणि मनोज शिंदे (वय २६) हे दोघे जमिनीखालील एका अरुंद चेंबरमध्ये उतरले होते. मात्र, चेंबरमधून बाहेर पडता न आल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दोघे चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चेंबरमधील धोकादायक परिस्थितीत जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत दोन्ही कामगारांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

चेंबरमध्ये नेमके कोणते काम सुरू होते, कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात आली होती का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. चेंबरमध्ये विषारी वायू निर्माण झाल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा प्रकार घडला, याचा तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या दुर्घटनेमुळे गेल्या वर्षी याच निगडी प्राधिकरणात घडलेल्या घटनेचीही आठवण झाली आहे. त्यावेळीही चेंबरमध्ये अडकून दोन जणांचा जीव गेला होता. वर्षभरानंतर पुन्हा अशाच प्रकारची दुर्घटना घडल्याने प्रशासनाने यापूर्वीच्या घटनेतून नेमका काय धडा घेतला, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
चेंबरमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत का, धोकादायक ठिकाणी उतरण्यापूर्वी गॅस आणि ऑक्सिजनची तपासणी केली जाते का, तसेच सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात का, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे. सलग दोन वर्षे अशा दुर्घटना घडत असतील, तर केवळ अपघात म्हणून या घटनांकडे न पाहता सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.







