हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव हे दोन्ही सण म्हटले कि गल्लोगल्ली निघालेल्या मिरवणुकीत युवकांचे नाचगाणे व धांगडधिंगा अशी प्रतिमा अपवाद वगळता सर्वांच्याच डोळ्यांसमोर येते. मात्र, पूर्व हवेलीतील सर्वात मोठ्या कदमवाकवस्ती व लोणी काळभोर या वेगवेगळ्या ग्रामपंचायत हद्दीतील युवकांनी एकत्र येत “दोन गावे एकच शिवजयंती” साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकच शिवजयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यासाठी लोणी काळभोरचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या मंदिरात ग्रामस्थांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही गावातील युवकांनी व नागरिकांनी एकमताने “दोन गावे एकच शिवजयंती” साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवजयंती निमित्त शनिवारी (ता. १८) चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी इयत्ता पहिली ते पाचवी बालगट, इयत्ता सहावी ते आठवीचा माध्यमिक गट व नववी ते बारावीचा मोठा गट अशा तीन गटात या स्पर्धा पार पडल्या. यावेळी चित्रकला स्पर्धेत ६५०, निबंध स्पर्धेत १००, तर वक्तृत्व स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी चित्रकला स्पर्धेत बालगटातील विद्यार्थ्यांना छापील चित्र आयोजाकडून देण्यात आले.
छत्रपती शिवरायांचे बालपण, छत्रपती शिवरायांचे व्यक्तिचित्र, शिवरायांचे गडकिल्ले, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे एकत्रित किंवा वैयक्तिक चित्र, रणरागिनी हिरकणी, बाल शिवाजी व सवंगडी, माँसाहेब जिजाऊ व बाल शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी या आठपैकी एका विषयावर माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी चित्र काढली.
मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा, रायरेश्वराची शपथ, शिवजन्मोत्सव सोहळा, पावनखिंड लढाई प्रसंग, किल्ला कोंढाण्याची चढाई (गड आला पण सिंह गेला), लाल महाल येथील चकमक प्रसंग, मावळ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज, घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज या आठ पैकी एका विषयावर चित्रे काढलेली पहायला मिळाली.
वक्तृत्व स्पर्धेत वरील प्रमाणेच वयोगट असून सकाळी ९ ते १२ या दरम्यान वक्तृत्व स्पर्धा पार पडली. बालगटातील विद्यार्थ्यांनी शिवबांचे बालपण, शिवरायांची पहिली मोहीम, मी शिवबांचा मावळा असतो तर, मी पाहिलेला शिवरायांचा किल्ला या चार विषयांपैकी एका विषयावर प्रत्येकी तीन मिनिटे देण्यात आली होती. माध्यमिक गटातील स्पर्धकाला बोलण्यासाठी ४ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.
माध्यमिक व मोठ्या गटातील स्पर्धकांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, गनिमी कावा, आज शिवाजी महाराज असते तर, माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यापैकी एका विषयावर तर मोठ्या गटात प्रत्येक स्पर्धकाला बोलण्यासाठी ५ मिनिटे देण्यात आली. निबंध स्पर्धेतील बालगटातील विद्यार्थ्यांनी २०० शब्दात माझा शिवबा, माॅसाहेब जिजाऊ, किल्ले रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ, शिवजयंती एक लोकोत्सव या चार पैकी एका विषयावर निबंधाचा विषय देण्यात आला होता.
रविवारी (ता. १९) दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत कवडीपाट टोलनाका ते ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरा पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूकीनंतर श्रीमंत अंबरनाथ मंदिर येथे रात्री ८ वाजता स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक समारंभ संपन्न होणार आहे. यावेळी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील जास्तीत जास्त नागरिकांनी या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.