पुणे : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अफूच्या बोंडाचा चुरा आणि अफिम विक्री केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे केली.
बलजिंदरसिंग जागरसिंग सोही (वय-५९, प्राधिकरण निगडी), नसीब रुपचंद मिस्त्री (वय-४०, रा. खराळवाडी, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार मितेश यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे दोघेजण अंमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ हजार ३९० रुपये किमतीचा ८२६ ग्रॅम अफूच्या बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ), ५३ हजार रुपये किमतीचा १३४ ग्रॅम अफिम, २५ हजारांचा एक मोबाईल फोन, १५ हजारांचा एक मोबाईल फोन आणि ६० हजारांची एक दुचाकी असा एकूण १ लाख ६५ हजार ९९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.