पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील भोसरी परिसरात पीएमपीएमएल बस स्टॉप आणि एसटी बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने चोरणारे दोन चोरट्यांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून भोसरी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आणून ४ लाख २२ हजार रुपये किंमतीचे ७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींनी नाशिक फाटा बस स्टॉप, पीएमटी बस स्टॉप भोसरी या परिसरातुन महिला प्रवाशांचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
मोहन गणेश जाधव (वय-३२ रा. केशवनगर, संभाजी चौक, मुंढवा मुळ रा. शास्त्री नगर झोपडपट्टी, अंबरनाथ, मुंबई), शिवराज अर्जुन वाडेकर (वय-२५ रा. मस्जिद जवळ, पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी भोसरी पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलींग करत आहेत. यावेळी पथकाने चोरी झालेल्या घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
तसेच भोसरी परिसरातील गर्दीच्या व रहदारीच्या ठिकाणी खाजगी वाहनाने पेट्रोलींग करत पीएमटी चौक भोसरी येथे आले असता, भोसरी बस स्टँड शेजारी दोन जण संशयितरित्या थांबल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता भोसरी पोलीस ठाण्यात दाखल ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहायक पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे सहायक पोलीस फौजदार राकेश बोयने, पोलीस अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे, प्रतिभा मुळे, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, तुषार वराडे, ज्ञानेश्वर साळवे यांनी केली.