पिंपरी : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात दिघी येथे धक्कादायक घटना घडली आहे. दवाखाना बांधण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्यासाठी एका डॉक्टर महिलेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून महिलेने अखेर आत्महत्या केली. या महिला डॉक्टरने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आपलं जीवन संपवले.
डॉ. अपर्णा अभिजीत शिंदे असे 33 वर्षीय महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. अपर्णा यांचा विवाह डुडुळगाव येथे डॉ. अभिजीत शिंदे याच्यासोबत झाला होता. पती अभिजित हा देखील डॉक्टर आहे. त्यामुळे दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी अपर्णा यांचा छळ करण्यात आला. त्यांना जमिनीवर नाक घासायला लावून मारहाण करण्यात आली होती.
इतकेच नाहीतर त्यांना घरातून बाहेरही काढण्यात आले होते. नंतर जेव्हा अपर्णा या 15 सप्टेंबरला सासरी गेल्या. तेव्हा त्यांचा पुन्हा पैशांसाठी छळ करण्यात आला. सततच्या छळाला कंटाळून अखेर डॉ. अपर्णा यांनी सातव्या मजल्यावरील प्लॅटच्या बाल्कनीतून खाली उडी मारुन आत्महत्या केली.
डॉ. अपर्णा यांच्या भावाची पोलिसांत फिर्याद
याप्रकरणी डॉ. अपर्णा यांचा भाऊ घन:शाम भानुदास पवार (वय 31, सध्या रा. पूर्णानगर, पिंपरी) यांनी दिघी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉ. अपर्णा शिंदे यांचा पती डॉ. अभिजीत अशोक शिंदे (वय 40, रा. अमुल्यम सोसायटी, डुडुळगाव), सासरे डॉ. अशोक बाबुराव शिंदे यांच्यासह सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.