पुणे : नागरिकांना मिळकतर वेळेत भरता यावा, यासाठी मार्च २०२३ अखेरपर्यंत सुट्टीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी महापालिकेकडून केवळ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्च महिन्यात सुटीच्या दिवशी कर भरणा केंद्रे सुरू ठेवली जात होती.
महापालिकेकडून शहरातील नागरिकांना मिळकतकराची बिले आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात (एप्रिल) पाठविली जातात. तर या बिलांची दोन सहामाहित विभागनी केली जाते. त्यात पहिली सहामाही १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत असते. तर या कालावधीत नागरिकांना ३१ मे पर्यंत कर भरल्यास महापालिका मिळकतकराच्या सर्वसाधारण करात ५ ते १० टक्के सवलत देते. तर ३० जूनपर्यंत कर न भरल्यास प्रत्येक महिन्यात दोन टक्के दंड आकारणी सुरू करण्यात येते.
तर तसेच दुसरी सहामाही १ ऑक्टोबर ते ३१ मार्चपर्यंत असते. या कालावधीत नागरिकांनी ३१ डिसेंबरपर्यंत कर न भरल्यास थकबाकीवर दोन टक्के दंड आकारला जातो.
त्यामुळे वर्षाअखेरीस हा थकबाकीचा दंड २४ ते २५ टक्के होतो. त्यामुळे नागरिकांवर दोन टक्के दंडाचा बोजा पडू नये, यासाठी महापालिकेकडून ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी करभरणा केंद्र सुरूच ठेवली जाणार आहे.
दरम्यान, महापालिकेच्या या केंद्रावर सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत रोख रक्कम, डीडी, धनादेशाद्वारे मिळकतकर भरता येणार आहे.
तसेच यापुढील तीन महिनेही ही सर्व कर भरणा केंद्र सुटीच्या सर्व दिवशी सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.