पुणे : आता सर्व पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यासाठी उमेदवार चाचपणी सुरु आहे. तसेच आता मायुतीमध्ये पिंपरीच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या पिंपरी विधानसभेच्या जागेवर आरपीआयसह भाजपचाहि डोळा असल्याची माहिती समोर येत आहे. पिंपरी विधानसभेत बारणेंना लीड मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चिंचवड आणि भोसरी प्रमाणेच पिंपरी विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
लोकसभा निवडणुकांची धामधूम शांत झाली असून आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. अशातच आता जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. आपलं प्राबल्य असलेल्या आणि प्रतिष्ठेच्या मतदारसंघांसाठी पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत असल्याचे सद्याचे चित्र आहे. लोकसभेप्रमाणेच आता राज्यातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने जोरदार प्रदर्शन केल आहे. तर महायुतीला मात्र हाराकिरी पदरात पडली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणाऱ्या पिंपरी विधानसभेवर आठवलेंच्या आरपीआयसह भाजपचा ही डोळा असल्याची माहिती समोर येत आहे. आरपीआयनं तर लोकसभेची पुनरावृत्ती करायची नसेल, तर महायुतीनं पिंपरी विधानसभा आम्हाला सोडावी सोडावी, असा इशाराच दिला आहे. आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरीच्या जागेवर दावा ठोकला आहे. तर मावळ लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंनी महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे पिंपरी विधानसभेत खासदार श्रीरंग बारणे यांना भाजपमुळं लीड मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. पिंपरी विधानसभेवर भाजपच्या अमित गोरखेंनी हक्क दाखवला आहे. हे पाहता अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढताना दिसत असली तरी मात्र, त्यांनीसुद्धा काहीही झालं तरी मीच लढणार, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं चिंचवड आणि भोसरी प्रमाणेच पिंपरी विधानसभेच्या जागेवरून महायुतीत घमासान होण्याचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
विधानसभेत RPI ला दहा जागा द्याव्यात; आठवलेंचा दावा
महायुतीत विधानसभा जागा वाटपाचा तिढा आणखीन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी विधानसभेसाठी दहा जागांवर दावा केला आहे. लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही, तरी आम्ही जोमानं काम केलं आहे. महायुतीच्या निवडणूक आलेल्या सतरा खासदारांमध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत आम्हाला आठ ते दहा जागा मिळाव्यात, असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.