पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षीय चिमुकल्याला इतर अल्पवयीन मुलांनी खेळता खेळात विहिरीत ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दल तसेच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चिमुरड्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वसीम नाज्जीमुद्दीन खान असं तीन वर्षीय चिमुकल्याच नाव आहे. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराजवळ असलेल्या विहिरी जवळ तीन ते चार मुलं खेळत होती. त्यापैकी, काही मुलांनी खेळत असताना यातील एका मुलाला थेट विहिरीत ढकलून दिले. तीन वर्षीय वसीम हा विहिरीत पडला असल्याची माहिती इतर मुलांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी चिखली पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
यानंतर तात्काळ चिखली पोलीस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून विहिरीतून मुलाला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, या घटनेत चिमुरड्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनास्थळी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.