पिंपरी : कोयता गॅंगचा बिमोड करण्यासाठी पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस अनेक उपाययोजना राबवत आहेत. मात्र, अद्याप कोयता गॅंगचा धुमाकूळ थांबलेला नसल्याचे निदर्शनास येत आहे. तुम्हाला माज आला आहे. तुमच्या मुलाचा खून करतो, त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत, किरकोळ वादातून टोळक्याने कोयत्याच्या साह्याने घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान करत, आरडा-ओरड केल्याची घटना गहुंजे परिसरात घडली.
याप्रकरणी सागर जालिंदर बोडके (वय २६, रा. गहुंजे, मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून प्रज्ज्वल मळेकर, करण भिसे याला ताब्यात घेतले आहे. तर, विकी शर्मा याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामुर्डी येथील मांडव टाहाळ्यात फिर्यादी सागर आणि विकी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्या वादातून विकी सोमवारी फिर्यादीच्या घरात शिरला आणि त्याच्या आई-वडिलांना कोयत्याचा धाक दाखविला.
यावेळी त्याने वडिलांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तुम्हाला माज आला आहे. तुमचा मुलगा सागर बोडकेचा खून करतो, त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. हातातील कोयत्याने घराच्या खिडकीची काच फोडली आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे, तर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.