पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका स्टील यार्ड कंपनीच्या मशीनमध्ये एक कामगार अडकल्याने मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कामगाराचे धड शरीरावेगळे झाले असून यात कामगारचा मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना कुदळवाडी परिसरात असलेल्या स्टील यार्ड कंपनीमध्ये घडली आहे. मोहनलाल जोखनप्रसाद गौतम असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी कंपनीचे मालक फैयाज उमर शेख आणि फारुख उमर शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मृत मोहनलाल गौतम हा मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे स्टील यार्ड नावाची कंपनी आहे. या कंपनीत मोहनलाल हा काम करत होता. यावेळी एका मशीनमध्ये अडकून एका कामगारांचा मुंडक पूर्णपणे धडावेगळं झाले आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत मोहनलाल या कामगारांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मोहनलाल याला मशीन चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तसेच त्याने कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नव्हते. ही मशीन चालवताना त्यावर लक्ष ठेवणारे कोणी कामगार नसताना, अपघात होऊ शकतो हे माहिती असताना देखील कंपनीचे मालक फैयाज उमर शेख आणि फारुख उमर शेख यांनी त्याला मशीन चालवण्यास भाग पाडले. या प्रकरणात चिखली पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्टील यार्ड कंपनीचे मालक फैयाज उमर शेख आणि फारूक उमर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या दोन्ही आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली आहे.
कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांमध्ये छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या छोट्या कंपन्यांमध्ये अनेक कामगार आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, अशा घटना घडल्यामुळे कामगारांची सुरक्षा पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणतीही दक्षता न घेता, कामगारांना त्या कामाची कुठलीही माहिती नसताना त्याला ते काम करायला भाग पाडले जाते, त्यातूनच अशा प्रकारच्या घटना घडत असतात.