पिंपरी : पुणे, पिंपरी चिंचवड शहरात तसेच जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशातच आता शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातून २९ लाखांचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. एवढचं नाही तर सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान करून डीव्हीआर देखील लंपास केला आहे. ही घटना प्राधिकरण निगडी येथील पेठ क्रमांक २५ मधील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाच्या दुकानामध्ये शुक्रवारी (दि. २४) रात्री साडेनऊ ते शनिवारी (दि. २५) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
संदीप छगनराव बुहाडे (वय-५०, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप बुहाडे यांचे प्राधिकर निगडीमध्ये श्रीलक्ष्मी ज्वेलर्स या नावाने दुकान आहे. या दुकानाचे शटर अर्धवट वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील तिजोरी तोडून २० लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ९ लाख रुपये किमतीचे १० किलो चांदीचे दागिने, १८ हजारांची रोकड तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा १ हजार रुपये किमतीचा डीव्हीआर चोरून नेला.
तसेच चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कट करून नुकसान केले. तसेच फिर्यादी संदीप यांच्या दुकानाशेजारील इतर दुकानांचे सीसीटीव्ही देखील तोडले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख करत आहेत.