पिंपरी : भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखालील अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे येथील एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. अर्धवट स्थितीतील कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे अर्बन स्ट्रीटच्या कामाचे कठडे आणि त्याच्या लोखंडी गजाबाबत तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी गव्हाणे यांनी केली होती. त्यानंतर रातोरात या कठड्यांचे लोखंडी गज कापण्यास सुरुवात करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली अर्बन स्ट्रीटचे काम करण्यात आले आहे. यावर तब्बल 42 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे. सध्या हे काम बंद करण्यात आले आहे. मात्र, अर्धवट सोडलेल्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. या कामाचे कठडे, कठड्यातून बाहेर आलेले लोखंडी गज नागरिकांच्या दुखापतीला कारण ठरत होते. याचा फटका शुक्रवारी एका निष्पाप जीवाला बसला.
भोसरीतील गव्हाणे वस्ती परिसरात एका नागरिकाची गाडी मारुती शोरूम समोर स्लिप झाली आणि ते थेट या कठड्यांच्या बाहेर आलेल्या लोखंडी गजावर जाऊन पडले. हा लोखंडी गज संबंधित व्यक्तीच्या छातीमध्ये आरपार घुसला. त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अजित गव्हाणे यांनी पिंपरी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणाऱ्या गोष्टींकडे सोयस्करपणे दुर्लक्ष कसे होते असा जाब विचारला. या सर्व अपघात प्रकरणाची चौकशी करून अशा प्रकारे चुकीचे व अर्धवट काम केलेल्या संबधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच तातडीने भोसरी उड्डाणपूलाखाली ज्या ठिकाणी असे धोकादायक लोखंडी गज दिसून येतात. त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात व भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात अशा सूचना त्यांनी केल्या होत्या.
त्यानंतर रातोरात उड्डाणपुलाखालील लोखंडी गज कापण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच कठड्यांबाबत देखील योग्य खबरदारी घेतली जाईल, असे देखील प्रशासनाने म्हटले आहे.
प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे एखाद्याला नाहक जीव गमवावा लागतो. प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे उपाययोजना प्रशासनाने कराव्या यासाठी पाठपुरावा केला जाईल.
– अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका