रावेत (पुणे) : पोलिस त्यांच्या कर्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात. पण आता हेच पोलिस एका रुग्णासाठी देवदूत बनून मदतीला आले. रावेतच्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका महिलेने विषारी औषध प्राशन केले होते. पण तिला वेळेत उपचार मिळावे यासाठी या पोलिसाने स्वत: रुग्णवाहिका चालवत संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल केले.
मस्के वस्ती रावेत येथे बुधवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजता एक महिलेने विषारी औषध प्राशन केले होते. याबाबतचा फोन पोलिस नियंत्रण कक्षातून रावेत पोलिस स्टेशनच्या बीट मार्शल पोलिस कर्मचाऱ्यांना आला. काही मिनिटांतच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मस्के वस्ती येथे पोहोचले. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांनी पोलीस शिपाई दया देवकर, संदेश जाधव, नवीन चव्हाण, अजित बेंडभर यांनी तत्काळ रुग्णवाहिकेचा शोध घेतला. मात्र, त्यात यश आले नाही.
नंतर रुग्णाला वायसीएम रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका होती पण चालक नव्हता. त्यामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सात्रस यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत महिलेला रुग्णालयात नेले. पोलिसांच्या या कार्यतत्परतेने रुग्णाचे प्राण वाचले.