पुणे : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या पत्नीचा खून पतीनेच सुपारी देऊन केल्याची धक्कादायक घटना चाकण पोलिसांनी तपासादरम्यान उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
गोरक्ष बबन देशमुख, (वय-३५, रा. मेदनकरवाडी ता. खेड २) रोशन गजानन भगत उर्फ रॉकी वय २० रा. मेदनकरवाडा मुळ रा. रूई ता. मानोरा जि. वाशीम), देवानंद गजानन मनवर वय-२४ रा. वाडा ता. मानोरा जि. वाशीम), बबन शिवलींग देशमुख वय -६२ रा. पडेगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. तर आशा गोरक्ष देशमुख, (वय-३० रा. बोरजाई नगर, मेदनकरवाडी ता. खेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ०१) गोरक्ष बबन देशमुख (वय ३५, रा. बोरजाई नगर, मेदनकरवाडी ता. खेड याने चाकण पोलीस ठाण्यात पत्नी आशा २९ ऑक्टोंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. आरोपी गोरक्ष देशमुख हा वारंवार पोलिसांकडे येऊन चौकशी करीत होता. यावरून पोलिसांना संशय बळावला व त्यांनी डि. बी. पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांचेकडे देवुन सदर मिसींग बाबत तपास पथकाचे प्रसन्न ज-हाड, विक्रम गायकवाड व तपास पथकास सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिले होते.
गोरक्ष देशमुख यास ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सुरूवातीला उडवा उडवीची उत्तरे देवुन वारंवार घटनेची व घटनास्थळाची विसंगत माहिती दिली त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. त्याचेकडे अधिक सखोल विचारपुस केली असता त्याने त्याची पत्नी अशा हिचा बाहेर पुरषाशी अनैतीक संबंध असल्याचे तिचे चारीत्रवर संशय घेवुन त्या कारणावरून तीला जिवे ठार मारण्याचे ठरविले. व त्याने त्याचे ओळखीचा रोशन गजानन भगत उर्फ रॉकी यास ठार मारण्यासाठी एक लाख रुपये सुपारी देण्याचे ठरविले.
दरम्यान, रॉकी याने चाकण येथील त्याचे वरील साथीदारांना सोबत घेवुन दिनांक २८ सप्टेंबरला आळंदी घाटाचे जंगलामध्ये गोरख याने साथिदारांचे मदतीने आशा हिला राहते घरात दोरीने गळा आवळुन व तोंडावर उशी दाबुन ठार मारून प्रेत आळंदी घाटात आधिच खणुन ठेवलेल्या खडडयामध्ये पुरल्याची माहिती दिली. सदर घटने बाबत सपोनि विक्रम गायकवाड यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवुन चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गोरक्ष देशमुख याचे सोबतचे सुपारी घेतलेले इतर आरोपी हे गुन्हा केल्यानंतर पैसे घेवुन पळुन गेले होते. तपास पथकातील सपोनि विक्रम गायकवाड व पथकाने आरोपी रोशन गजानन भगत यास चाकण परीसरातुन तर सपोनि प्रसंन्न जराड व पथकाने देवानंद गजानन मनवर यास म्हसवड सातारा येथे जावुन सापळा लावुन ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश हिंगे, पोलीस हवालदार राजु जाधव, संदिप सोनवणे, हनुमंत कांबळे, निखिल शेटे, सुदर्शन बर्डे, भैरोबा यादव, भाग्यश्री जमदाडे, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर, उध्दव गर्जे यांनी केलेली आहे.