पिंपरी : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ थांबायचं नाव घेईना. थेरगाव येथील बारणे चाळीत टोळक्याने कोयत्याने वार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच काेयता हातात फिरवून ‘कोणी मध्ये आले तर मुडता पाडीन’ अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. आनंद सुभाष जेवूरकर (२९, रा. हिरामण बारणे चाळ, थेरगाव) यांनी या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आखिल उर्फ आदेश सुधीर बाबर आणि त्याचे इतर दोन साथीदार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी आनंद हे कामावरून येऊन त्यांच्या मित्रांसोबत हिरामण बारणे चाळीजवळ गप्पा मारत थांबले होते. यावेळी आखिल आणि त्याचे साथीदार दुचाकीवरून आले. आखिल हा फिर्यादी आनंद यांच्या ओळखीचा आहे. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी आनंदला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आखिलने त्याच्या कंबरेचा कोयता काढून वार करून आनंदला गंभीर जखमी केले.
यावेळी आनंद यांनी आरडाओरडा केला असता आमच्या आडवे कोणी यायचं नाही. आडवे आलात तर मुडदा पाडीन, असं म्हणून यावेळी आखिल आणि त्याच्या साथीदारांनी हातातील कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे चाळीतील लोकांनी भीतीपोटी दरवाजे बंद करून घेतले. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.