पुणे : सातबारा उताऱ्यावर गिनी गवताची नोंद कमी करण्याच्या कामासाठी शेतकऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना मावळ तालुक्यातील खांडशी गावच्या तलाठ्याला रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कार्ला मंडलाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आली.
अंकुश रामचंद्र साठे (वय-४३, रा. तलाठी सजा खांडशी, ता. मावळ. मूळ वरुड भैरोबा मंदिराजवळ ता. खटाव, जि.सातारा) अशी कारवाई करून अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करणात आला आहे. याबाबत एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तक्रारदार शेतकरी यांच्या गट नं. ९/१ सातबारा उताऱ्यावर गिनी गवत अशी नोंद झालेली आहे. ती नोंद कमी करून नवीन दुरुस्त सातबारा देण्यासाठी खांडशी गावचे तलाठी अंकुश साठे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाचेची रक्कम घेऊन कार्ला येथील मंडल कार्यालयात शेतकऱ्याला अंकुश साठेने बोलावले होते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या तलाठी अंकुश साठेला रंगेहाथ पकडले. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.