पिंपरी : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन दोन जणांनी तरुणाच्या घरात घुसून वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर हातातील कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड करुन मुलाला संपवण्याची धमकी दिली. हा प्रकार १४ फेब्रुवारीला रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथील रस्टन कॉलनीत घडला. याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात १५ फेब्रुवारीला फिर्याद दिली आहे. यावरुन प्रणव सुरेश कांबळे (रा. आकुर्डी), हर्षल संजय लोहार (रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती घरात असताना आरोपी प्रणव कांबळे आणि हर्षल लोहार हे दोघे हातात कोयता घेऊन घरात घुसले. दोघांनी फिर्यादी यांचा मुलगा सौरभ कुठे आहे अशी विचारणा केली. तसेच माझ्या बहिणीसोबत लफडे करतो काय असे म्हणत फिर्यादी यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी आणि हाताने जबर मारहाण करून शिवीगाळ केली. हातातील कोयता टीव्हीवर मारुन घरातील नुकसान केले. आरोपी हर्षल लोहार याने तुमचा मुलगा सौरभ याला संपवून टाकतो अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर करत आहेत.