पिंपरी : मावळ तालुक्यातील वराळे गावात एक धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर घरच्या मंडळीकडून साखरपुडा करण्यात आला. मात्र मुलाचे दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याने त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे आपले आयुष्य बरबाद झाले, असा विचार करून मुलीने घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार (दि. २) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी विकास राजाराम धामनकर (वय -३०, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनायक संभाजी मराठे (वय-३०, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामनकर याचा साखरपुडा वराळे येथील एका २९ वर्षीय तरुणीशी एप्रिल महिन्यात झाला होता. त्या साखरपुड्याचे फोटो संशयित आरोपी विकास याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले होते. परंतु त्याच्या प्रेमसंबंधाबाबत मुलीकडील लोकांना कल्पना नव्हती. साखरपुडा झाल्यानंतर मुलाने लग्नास नकार दिला. हा धक्का मुलगी पचवू शकली नाही. आपली आणि घरच्यांची बदनामी झाली असे तिला वाटले. त्यामुळे तिने घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.