पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात बॅनर फाडल्याचा जाब विचारुन तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंडळाचा लावलेला बॅनर का फाडला अशी विचारणा करुन सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी 9 एप्रिलला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भोईआळी तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
मयुर अनिल इंगळे (वय-24 रा. रविवार पेठ, तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे. तर त्याचे इतर साथीदार मिथुन पारखे, गौरव जरग, सौरभ जरग, विशाल शेळके, शगुन पारखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आकाश अशोक परदेशी (वय-25 रा. भोई आळी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी आकाश परदेशी हे त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भोई आळी येथे उभे होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. आरोपींनी बॅनर का फाडला अशी विचारणा करत फिर्यादीला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी पैकी एकाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून आकाश याच्या डोक्यात घालून गंभीर जखमी केले.
त्यावेळी फिर्यादीला वाचवण्यासाठी त्यांचे मामा अमित परदेशी आले असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक यमगर करत आहेत.