पिंपरी : युनिकॉर्न मोटारसायकलची चोरी करुन फेसबुक मार्केट प्लेस यावरुन विक्री करणा-या आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ७ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या तब्बल १६ युनिकॉर्न मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. महादेव शिवाजी गरड (वय २६, रा. हरिओम हौसिंग सोसायटी, गल्ली नंबर १, शिवरकर चौकाजवळ, ताम्हाणेवस्ती चिखली, पुणे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई २४ ऑक्टोबर रोजी चिखली परिसरातील मोरेवस्ती येथील आंगणवाडी चौकाकडुन शिवरकर चौकाकडे जात असताना केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे व पथकातील अंमलदार हे मोरेवस्ती चिखली भागामध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एक इसम युनिकॉर्न गाडीवरुन आंगणवाडी चौकाकडुन शिवरकर चौकाकडे जात असताना त्याचा संशय आल्याने पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याचे खिशात मोटारसायकलच्या पाच चाव्यांचा जुडगा, त्या सर्व चाव्यांवर HONDA असे इंग्रजीमध्ये लिहीलेले व युनिकॉर्न चे चिन्ह असलेल्या अशा चाव्या मिळुन आल्या. तेव्हा चिखली पोलीस स्टेशन हद्दीतुन युनिकॉर्न मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा हाच चोरटा असल्याचे तपास पथकाच्या लक्षात आले.
दरम्यान, त्याच्याकडील युनिकॉर्न मोटारसायकल नंबर एम.एच.१४.एच.व्ही.८३५४ याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. मात्र, त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदरचे गाडी ही चिखली पोलीस ठाण्यातील गुन्हयातील चोरीला गेलेली युनिकॉर्न असल्याची खात्री झाली.
आरोपीला अटक करुन विश्वासात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने अशी माहीती दिली की, त्याचे सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचे शिक्षण झालेले असुन त्याने मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये मोरेवस्ती, शरदनगर, त्रिवेणीनगर, चिखली या परिसरातुन ब-याच युनिकॉर्न मोटारसायकलींच्या चो-या केलेल्या आहेत.
त्याचेजवळ पाच युनिकॉर्न गाडयांच्या डुप्लीकेट चाव्या असुन त्याचा वापर करुन तो गाडयांची चोरी करतो. तो त्याचेजवळील मोटारसायकलवरुन फिरुन युनिकॉर्न गाडी कोठे पार्क केलेली आहे. जी सहज चोरुन नेता येईल अशी गाडी निवडतो. त्यानंतर त्याची मोटारसायकल काही अंतरावर पार्क करुन तेथुन चोरी करण्यासाठी निवडलेल्या युनिकॉर्न मोटारसायकल जवळ जावुन गाडी चोरुन घेवून जातो.
आरोपीने चोरी केलेल्या गाड्या विकण्याकरीता अजय जाधव या नावाने त्याने फेसबुक मार्केट प्लेस यामध्ये त्याचे अकाउंट काढले असुन चोरी केलेल्या युनिकॉर्नचा फोटो तो फेसबुक मार्केटप्लेस या अॅपमध्ये टाकुन त्याची किंमत तो ३० ते ३५ हजार रुपये असल्याचे टाकतो. त्यानंतर सामान्य नागरिक त्याचे प्रलोभणाला बळी पडुन त्याचेकडुन गाडया खरेदी करतात.
त्याला गाडी विकत घेणा-या लोकांनी गाडीच्या कागदपत्राबाबत विचारपुस केली, तर तो त्यांना गाडीचे कागदपत्र फायनान्स कंपनीकडे आहेत. तुम्हाला नंतर कागदपत्रे देतो, असे सांगुन तो सदरची गाडी २५ हजार ते ३० हजार रुपयांना रोख विकत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. आरोपीकडुन आतापर्यंत एकुण ७ लाख ३० हजार रुपयांच्या एकुण १६ युनिकॉर्न मोटारसायकली जप्त केल्या असुन त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत.