लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर बसचा चालक, वाहक यांच्यासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज (दि. १९) पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास किलोमीटर क्रमांक ७३/७०० जवळ घडली आहे.
विश्वनाथ भगवान वाघमारे (कारेगाव, ता. पाथर्डी) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर जखमींमध्ये एसटी बसचे चालक अकोलकर, वाहक खंडागळे (पूर्ण नाव समजले नाही) काजल बाळू गायकवाड (रा. पारगाव, बीड), मीना सुरेश केदार, महादेव केरू पाखरे (रा. पाथर्डी) यांचा समावेश असून अन्य चार जखमींची नावे समजू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी डेपो ची मुंबईला जाणारी एसटी बसने (एमएच १४ बीटी ४२५८) पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास द्रुतगती मार्गावर ताजेनजीक तांदूळ घेवून जाणारा ट्रकला (क्र. एमएच १२ पीक्यू ८७४८) मागून जोरदार धडक दिली. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह अन्य आठ प्रवासी जखमी झालेत. या अपघाताची माहिती मिळताच कामशेत पोलिस महामार्ग सुरक्षा पथक, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.