पुणे : पुण्यातील मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी मी महायुतीचा उमेदवार असेल, असं ठामपणे म्हटलं आहे. पण कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? यावर ही त्यांनी मी महायुतीचा उमेदवार असेल असं म्हणत बारणेंनी संदिग्धता कायम ठेवली आहे. बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने ही विरोध दर्शविला आहे. ते मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपने कमळावरचा उमेदवार असायला हवा, मग बारणे असले तरी आमची हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यालाच अनुषंगाने बारणे भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा मावळ लोकसभेत रंगली होती. अशातच मी महायुतीचा उमेदवार असेन, असं म्हणत बारणेंनी आणखी संदिग्धता वाढवली आहे. तर ज्या उमेदवाराचा मतदारसंघात थांगपत्ता नाही, त्या उमेद्वाराबद्दल मी बोलणार नाही. असं म्हणत महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंची खिल्ली उडवली.
सुनील शेळके यांचा श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध
मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून डिवचले होते. बारणे यांना उमेदवारी न देता भाजपला उमेदवारी देण्यात यावी असं विधान करत त्यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या संदर्भात श्रीरंग बारणे म्हणाले, प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. मात्र, याबाबत मीडिया वेगळं चित्र रंगवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी उमेदवारी ही गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष ठरलेली आहे. पुन्हा मुंबईत होणाऱ्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षा बारणे यांनी व्यक्त केली आहे.