पिंपरी : चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाधववाडी परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी (दि. 12) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये एक मित्र आणि सह आरोपी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अजय सुनील फुले (वय-19 वर्षे,रा. मोहननगर), तर सह आरोपी कीर्ती भिऊलाल लिलारे अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर हर्षल सोनावणे (रा. जाधववाडी) असं गोळीबार केलेल्या तरुणाचे नाव आहे. या गोळीबारात श्याम चौधरी आणि कीर्ती भिऊलाल लिलारे या दोन आरोपींचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजय आणि त्याचा मित्र हर्षल हे चिखली परिसरात गॅस रिफिलिंगचे काम करतात. त्यांच्यामध्ये रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून हर्षल सोनवणे याने अजय फुले याच्यावर गोळीबार केला. यामध्ये अजय हा जखमी झाला असून प्रकृती चांगली आहे. दरम्यान, हर्षल सोनावणे याने केलेल्या गोळीबारात सह आरोपी कीर्ती लिलारे याला एक गोळी लागल्याने तो गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.