पिंपरी : चिखलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आशा वर्कर असलेल्या महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने गळा दाबून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी पतीला शुक्रवारी
(ता. 18 एप्रिल) ला चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी पतीने पोलिस ठाण्यात फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन केले. उपचारादरम्यान शनिवारी ( ता 19 एप्रिल) पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. कांचन शरद चितळे (वय 26 ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शरद रुपचंद चितळे (33, रा. रुपीनगर, तळवडे) असे विष पिऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद चितळे हा एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. शरदची पत्नी कांचन ही आशा वर्कर म्हणूनण काम करत होती. कांचनचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरद याला संशय होता. 13 एप्रिलला त्याने राहत्या घरात कांचन झोपेत असतानाच तिचा गळा आवळला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली.
त्यानंतर त्याने स्वत: देखील नायलाॅनच्या दोरीने पंख्याला गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच चिखली पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. तेंव्हा शरद हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांचन हिला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
दरम्यान, शरद याच्यावर उपचार सुरू होते. त्याला शुक्रवारी ( ता. 18) रुग्णालयातून सोडण्यात आले. कांचन हिचा शवविच्छेदन अहवालातुन गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी शरद याला नातेवाईकांसह चिखली पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यावेळी त्याने लघुशंकेचा बहाणा करून पोलिस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद करून फरशी पुसण्याचे लिक्विड पिला. त्याला नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला.
पोलिस ठाण्यात किंवा पोलिस ठाण्याच्या आवारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) संबंधित प्रकरणाचा तपास केला जातो. शरद चितळे याच्या आत्महत्या प्रकरणातही सीआयडीकडून तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील मृतांचे शवविच्छेदन पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात केले जाते. मात्र, शरद चितळे याने पोलिस ठाण्यातच फरशी पुसण्याचे लिक्विड पिऊन आत्महत्या केली. पोलिस ठाण्यात किंवा आवारात मृत्यू झाल्यास संबंधित शवविच्छेदन तज्ज्ञ डाॅक्टरांच्या पॅनेलकडून केले जाते. मात्र, पुण्यातील ससून रुग्णालयात डाॅक्टरांचे पॅनेल उपलब्ध असल्याने शरद चितळे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात होणार आहे.