पिंपरी : महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका तरुणासह तिघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. ५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कृष्णा वाघिरे (वय १८) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १४ वर्षीय मुलीने बुधवारी (दि. ६) याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर पीडित विद्यार्थिनी घरी चालली होती. त्यावेळी आरोपी कृष्णा वाघिरे हा त्याच्या दोन मित्रांसोबत तिथे आला. त्याने विद्यार्थिनीचा हात पकडून सोबत येण्यास सांगितले. मात्र तिने त्यास प्रतिकार केला असता त्याने तिचे फोटो व्हायरल करण्याची आणि आईला पाठविण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्या विद्यार्थिनीला काळेवाडीतील अल्फान्सो स्कूल पाठीमागील मैदानात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत शरीरावर ठिकठिकाणी चावे घेतले. त्यावेळी त्याचे मित्रही त्याठिकाणी होते. त्यानंतर कोणाला काही सांगितले तर पुन्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ते तिघेजण तेथून निघून गेले. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.