पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यावसायिकाची तब्बल 23 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असं सांगून शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची २३ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये ४ डिसेंबर २०२३ ते २९ जानेवारी २०२४ च्या दरम्यान ही घटना घडली.
या प्रकरणी संतोष एकनाथ गायकवाड (४७, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विविध मोबाईल क्रमांक धारक तसेच बँक खातेधारक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, एका व्यक्तीने कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, अशा आशयाची जाहिरात सोशल मीडियावर टाकली होती. ती जाहिरात फिर्यादी गायकवाड यांनी पाहिली. त्यानंतर संशयितांसोबत त्यांचा संपर्क झाला. यावेळी त्यांनी गायकवाड यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले.
पैसे कमावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी शेअर्स खरेदी करण्यासाठी गायकवाड यांच्याकडून संशयितांनी २४ लाख रुपये घेतले. दरम्यान त्यांनी गायकवाड यांना ६० हजार रुपये परत दिले. मात्र, उर्वरित २३ लाख ४० हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.