पिंपरी (पुणे) : एका तरुणाने इस्टाग्रामवरून तरुणीशी मैत्री करून तिचा फोटो डीपीवर ठेवला. तसेच माझ्या एका मित्राने तुझ्याविषयी अपशब्द वापरल्याने मी त्याचा खून केला, अशी खोटी माहिती देऊन तरुणीकडून तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज बळकावला आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून आरोपी शाहनवाज सिराजुद्दीन अन्सारी (वय २० रा. सानपाडा, नवी मुंबई, मूळ गाव सलीमपूर, उ. प्र.) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना शनिवार २४ फेब्रुवारीला चिखली प्राधिकरणात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहनवाज अन्सारी याने चिखली प्राधिकरणातील एका तरिणीशी इंस्टाग्रामवर मैत्री केली. तरुणीच्या इस्टाग्रामवरील फोटो त्याने आपल्या डीपीवर ठेवल्याने त्याच्या एका मित्राने अपशब्द वापरले, म्हणून मी त्याचा खून केल्याची खोटी माहिती त्याने तरुणीला दिली. त्यामुळे पोलिस तुझ्या घरापर्यंत पोहचतील. हे प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची गरज आहे.
तसेच पैसे दिले नाही तर मी तुला आणि तुझ्या घरच्यांना संपवून टाकील, अशी धमकी देखील आरोपीने तरुणीला दिली. या कारणामुळे तरूणीला १ लाख रुपये रोख आणि ५ लाख ४० हजार रुपयांचे सोने असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने देण्यास भाग पाडले. ही घटना तरुणीच्या वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.