पिंपरी : पुण्यात रिक्षा चालकाने प्रवाशासोबत २० रुपयांवरून भांडण करून खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे, तुला जिवंत ठेवत नाही, असं म्हणत प्रवाशाच्या डोक्यात दगड मारून प्रवाशाला जखमी केले. ही घटना महाळुंगे येथे मंगळवारी २७ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रिक्षा चालक रोहन शहाजी गायकवाड (२३, रा. चाकण. मूळ रा. जामखेड, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती बँकेत कामाला जाण्यासाठी रिक्षातून जात होते. ते महाळुंगे कमानीजवळ रिक्षातून उतरले. तिथे रिक्षाचे २० रुपये सुटे न दिल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाने फिर्यादी महिलेच्या पतीसोबत वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? मला तुम्ही ओळखत नाही का.
माझ्याबद्दल तुम्ही माहिती घेतली नाही. मी इथला भाई आहे. तुला जिवंत ठेवत नाही, असं म्हणत रिक्षाचालकाने फिर्यादी महिलेच्या पतीच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रिक्षाचालकाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार करत आहेत.