पुणे : पुण्यातील चिंचवड येथील धनेश्वर मंदिराजवळून एक मेंढपाळ २८ फेब्रुवारी रोजी गावातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. गुन्हे शाखा युनिट दोनने या प्रकरणाचा कसून तपास केला असता त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले. अपहरण करण्यात आलेले व्यक्ती हे एक मेंढपाळ आहेत. या मेंढपाळाची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून सुखरूप सुटका करण्यात आली. तुकाराम साधू शिंपले (वय 40) असे सुटका केलेल्या मेंढपाळाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर (वय 22, रा. काळ्याची वाडी, ता. धारूर, जि. बीड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता धनेश्वर मंदिर चिंचवडगाव येथून एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता तुकाराम शिंपले यांचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये चारचाकी गाडी आणि काहीजण आढळून आले.
ही गाडी बीड जिल्ह्यात गेल्याचे समजल्याने गुन्हे शाखेचे एक पथक बीडकडे रवाना करण्यात आले. यावेळी शिंपले याचं अपहरण केल्यानंतर आरोपींनी तुकाराम शिंपले याला बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम ठिकाणी एका खोलीत डांबून ठेवले होते. मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोन पोलीस पथकाने अतिशय कौशल्याने तपास करत तुकाराम शिंपले यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पैशासाठी केले अपहरण
दरम्यान, ज्ञानेश्वर मूळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्याचा रहिवासी आहे. त्याच गावात तुकाराम शिंपले मेंढपाळ राखण्याचा व्यवसाय करत होते. आपल्या गावी असताना तुकाराम शिंपले याने मेंढपाळ रघुनाथ नरुटे यांच्या शेळ्या मेंढ्याची विक्री करण्यामध्ये मध्यस्थी केली होती. मात्र खरेदी दराने रघुनाथ यांचे जवळपास १४ लाख रुपये न दिल्याने, मेंढपाळ विक्रेता रघुनाथ हा तुकाराम शिंपले यांच्याकडे वारंवार पैशासाठी तगादा लावायचा.
त्यामुळे शिंपले यांनी आपल्या पत्नीसह आपलं मूळ गाव सोडून दोन वर्षांपासून चिंचवड भागातील धनेश्वर मंदिर या ठिकाणी राहत होते. त्यामुळे तुकाराम शिंपले यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी रुघुनात नरुटे याने आपला भाचा ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर याच्या मदतीने एका चारचाकी वाहनांमध्ये 28 फेब्रुवारीला चिंचवड मधून तुकाराम शिंपले याचा अपहरण केलं होतं.