पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘इंद्रायणी थडी-२०२३’ महोत्सावात पाच दिवसांमध्ये तब्बल साडेसात कोटींहून रुपयांची उलाढाल झाली आहे. या महोत्सवाला प्रेक्षकांनी ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद दिला असून, तब्बल २४ लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे, अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांनी दिली आहे.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या हेतूने ‘इंद्रायणी थडी-२०२३’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. बुधवार (ता.२५) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते महोत्सवाचा शुभारंभ झाला. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाची सांगता रविवारी (ता.२ ) करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, क्षेत्रप्रचारक अण्णा पंडित उपस्थित होते.
महोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला बचतगटांचा प्रतिसाद मिळाला. तब्बल १७ एकर जागेवर भरलेल्या या महोत्सवामध्ये एक हजारहून अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप करण्यात आले. त्यामुळे सुमारे २० हजार महिलांच्या हाताला रोजगार मिळाला. महोत्सवात मोठी उलाढाल झाल्यामुळे महिला वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती, ग्राम संस्कृती, धर्मवीर छत्रपी संभाजी महाराज आणि शूरवीर मराठे सरदार यांचे पुतळे या ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. तसेच, भाजपा पक्षनिष्ठा दर्शवणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, बाबुराव पाचर्णे, दिगंबर भेडगे यांचे अर्धाकृती पुतळे उभारण्यात आले. त्याद्वारे भाजपा पक्षनिष्ठा आणि कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात आला. या संकल्पनेचे उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री पाटील यांनी कौतूक केले.
समारोप कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार प्राप्त दादासाहेब इदाते, राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त आयुष तापकीर, आंतरराष्ट्रीय गिर्यारोक गिरीजा लांडगे, शाहीर चेतन हिंगे, हिंदकेसरी अभिजित कटके, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय फुगे, काळुराम नढे यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवस सुरू असलेल्या या महोत्सवामध्ये कोणताही अनूचित प्रकार घडला नाही. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने सहकार्य केले. प्रचंड गर्दीचा हा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडला.
आमदार लांडगे यांनी मानले आभार…
महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या हेतूने सुरू केलेल्या या महोत्सवाची फलश्रृती झाली आहे, अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्याच्या इतिहासातील उच्चांकी गर्दीचा पहिलाच असा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी “इंद्रायणी थडी’’ असा लौकीत अवघ्या चार-पाच वर्षांत प्राप्त झाला. तमाम प्रेक्षक, पिंपरी-चिंचवडकर, सहभागी महिला बचतगट, स्टॉलधारक, संयोजन समिती, पोलीस प्रशासन, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि माझ्या सहकाऱ्यांसह हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मन:पूर्वक धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया आमदार लांडगे यांनी दिली.
अध्यात्म, राजकीय अन् मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक गुरूवर्य संभाजी भिडे, प्रखर हिंदूत्ववादी अध्यात्मिक गुरू कालिचरण महाराज, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, हिंदू राष्ट्रसेनेचे संस्थापक धनंजय देसाई, गोरक्षक शिवशंकर स्वामी यांच्यासह सर्वपक्षीय आजी-माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, यांनी या महोत्सवाची शोभा वाढवली. तसेच, अभिनेता पुष्कर श्रोत्री, स्वप्नील जोशी यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांनी या महोत्सवात सादीकरण केले. त्यामुळे इंद्रायणी थडीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली.