पिंपरी, (पुणे) : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाने स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये अवैध स्पा सेंटरवर कारवाई करण्यात येत आहे. अशातच आता ८ एप्रिल ला वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेस्टिंग स्क्वेअर मॉल येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या छाप्यात तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर एका आरोपीला अटक केली आहे. स्पा मॅनेजर उमेश उर्फ अनिकेत इंद्रजीत दुबे (वय-25 रा. कॅपिटल बिल्डिंग बाणेर गाव पुणे, मूळ राहणार उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, स्पा मालक महिलेवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार वैष्णवी विजय गावडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर कलाटे नगर परिसरातील प्रेस्टिंग स्क्वेअर मॉलमधील ‘द रेसी स्पा’ या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी वेश्याव्यवसाय करताना तीन तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी या तीनही तरुणींची सुटका करून स्पा मॅनेजर उमेश दुबे याला अटक केली.
आरोपींनी पैशाचे आमिष दाखवून सर्व तरुणींना या ठिकाणी आणले होते. त्यानंतर या तरुणींना जास्त पैशाचे आमिषाने त्यांच्याकडून आरोपी या ठिकाणी वेश्याव्यवसाय करून घेत होते. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कारवाईत पोलिसांनी बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. स्पा मालक महिलेवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.