पिंपरी : प्रतिबंधित केलेल्या रेड्डी अण्णा या बेटिंग वेबपोर्टलद्वारे जुगार खेळविणाऱ्या दहा जणांना रावेत पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. आरोपींनी ऑनलाईन जुगारासाठी बनावट बँक खाते, सीमकार्डच्या आधारे संगणक व मोबाईलद्वारे पासवर्ड घेऊन बनावट बँक खाते उघडून नागरिकांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. ही कारवाई पुनावळे येथील गायकवाडनगर येथील अॅडम व्हिले सोसायटीमध्ये करण्यात आली आहे.
पियुष शेषनारायण सोनी (वय-१९), मुनेश्वर चुरानंद देवागन (वय-१९), अजस अरुणकुमार सिन्हा (वय-२४), हेमंतकुमार नारायण ठाकूर (वय-२५), संजय माणिक परदेशी, माणिक पूरी (वय-१९), हितेश पुनाराम देवांग (वय-२७), सागर अशोक गजभिर (वय-२७), अनिकेत हेमंत यादव (वय-१९), अक्षय अमीन अस्थाना (वय-२७), फुलेंद्र अशोकराव कुमार (वय-२७, सर्व रा. डम व्हिले सोसायटी, गायकवाडनगर, पुनावळे) या दहा जणांना पोलिसांनी अटक केली असून आकाश दास ऊर्फ जॅक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रेड्डी अण्णा या नावाच्या प्रतिबंधित केलेल्या बेटिंग वेबपोर्टलद्वारे कट रचून रेड्डी अण्णा या नावाचा विनापरवाना ऑनलाईन जुगार खेळवताना ७ लाख ४८ हजार १०० रुपये किंमतीच्या ऑनलाईन जुगाराच्या साहित्यासह मिळून आले. या आरोपींनी ऑनलाईन जुगारासाठी वापरलेले बनावट बँक खाते, सीमकार्डच्या आधारे या खाते धारकांची ओळख वापरुन संगणक व मोबाईलव्दारे त्याचा पासवर्ड घेवून बनावट कागदपत्रांचे आधारे बँक खाते उघडले. त्याद्वारे सामान्य लोकांची फसवणूक केली. रावेत पोलिस तपास करीत आहेत.