पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील सोमाटणे परिसरात महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्याला गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी ६ मार्च रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास सोमाटणे टोल नाक्याजवळ एका लॉजमध्ये करण्यात आली. राहुल शिवाजी शिंदे (वय ३१, रा. धनकवडी, पुणे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार गणेश कारोटे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, संशयित आरोपी राहुल याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमाटणे टोल नाक्याजवळ एका लॉजमध्ये बुधवारी रात्री छापा टाकून कारवाई केली. त्यामध्ये ६ महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांवर आरोपी राहुल हा आपली उपजीविका भागवत असल्याचे तपासात समोर आले आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.