पुणे: पुण्यातून (Pune News) एक संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या एका 42 वर्षीय इंजिनिअरला कॅब चालकाने जोरात चावले. केवळ ॲपवरील भाड्यापेक्षा जास्त पैसे देण्यास नकार दिला म्हणून, संतापलेल्या कॅब चालकाने इंजिनिअरच्या डाव्या हाताचे बोट चक्क तोंडात धरून चावून तोडले. या भीषण हल्ल्यात इंजिनिअरच्या बोटाचा वरचा भाग शरीरापासून वेगळा झाला आहे.

सोमवारी आपली शिफ्ट संपवून नाना पेठ येथे घरी जाण्यासाठी ‘रॅपिडो’ ॲपवरून कॅब बुक केली होती. कॅब चालक आल्यावर त्याने ॲपवर दिसणाऱ्या ठराविक भाड्याऐवजी ‘मीटर’प्रमाणे जादा पैसे देण्याचा हट्ट धरला. इंजिनिअरने जादा पैसे देण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वीच चालकाने इंजिनिअरवर हल्ला केला आणि रागाच्या भरात त्यांचे बोट तोंडात घेऊन जोरात चावा घेतला.

या भीषण हल्ल्यानंतर जखमी इंजिनिअरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पीडिताने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत आरोपी कॅब चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.







