Pune News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून रुग्णालयातील आयसीयूमध्येच एका रुग्णाने वृद्ध महिलेवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत 69 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 13 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास औंध येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात घडली. बाबासाहेब शंकर डोंगरे (वय 42) यांना उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच वॉर्डमध्ये कांता मारुती जाधव (वय 69) यांच्यावरही उपचार सुरू होते.
दरम्यान, वॉर्डमधील दरवाजा बंद केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला हा वाद शाब्दिक पातळीवर होता. मात्र काही वेळातच परिस्थिती बिघडली आणि आरोपीने संतापाच्या भरात दरवाजाची काच फोडली. त्यानंतर त्याच काचेच्या तुकड्याचा वापर करून महिलेवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात जाधव यांच्या हाताला दुखापत झाली. घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमी महिलेला तातडीने उपचार दिले. या प्रकारामुळे रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118 आणि 324 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून रुग्णालयातील सुरक्षेच्या मुद्द्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







