Pune Crime : पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असून ताथवडे येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसावर एका व्यक्तीने कात्रीने हल्ला केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल मोहम्मद अन्सारी (वय 42) हे वाहतूक पोलीस ताथवडे अंडरपास परिसरात सायंकाळी सुमारे 7 वाजता वाहतूक नियमन करत होते. याच वेळी हर्षल सुपेकर नावाच्या संशयिताने अचानक त्यांच्या जवळ येत कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात अन्सारी जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. जखमी अवस्थेत असलेल्या अन्सारी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, काही दिवसांपूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली होती. त्याचाच राग मनात ठेवून हा हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर वाकड पोलीस ठाण्याने तातडीने तपास सुरू केला असून आरोपीच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी पोलिसाची विचारपूस केली. भररस्त्यात पोलिसावर झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.







