पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मोठी कारवाई करत देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर टाकलेल्या छाप्यात 9 महिलांची सुटका करण्यात आली आहे.

या कारवाईत विशेष म्हणजे एका बांगलादेशी तरुणीचाही समावेश असून तिला तस्करी करून भारतात आणल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणीला पुन्हा मायदेशी पाठवण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणामुळे मानवी तस्करीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार ही धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान लॉजच्या आड देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलिसांनी अशोक बाबुराव बाबर आणि अकिबुल खालेक मुल्ला यांना अटक केली आहे. तसेच सुदर्शन पवार, नाना बोराटे आणि साहिल उर्फ शाहीन मंडल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







