पिंपरी : पिंपळे सौदागर येथील शिवार चौकातील रेनबो प्लाझाच्या पाचव्या मजल्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने पर्दाफाश केला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालावरती गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २०) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे अॅपल ब्युटी सलून अँड स्पा येथे करण्यात आली.
अक्षय धनराज पाटील (वय-२४, रा. शिवार चौक, पिंपळे सौदागर, मूळ रा. जळगाव) असे अटक केलेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासह स्पा चालक मालक रोहन विलास समुद्रे (वय-३५ रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), भूषण पाटील (वय-३, रा. रहाटणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार वैष्णवी विजय गावडे (वय-३६) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील अॅपल ब्युटी सलून अँड स्पा येथे बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. या महिलांकडून आरोपी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात उघड झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.