पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाने अवैध धंदे करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुस-नांदे रोडवरील डिन्स रेसिडन्सी येथील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन तरुणींची सुटका केली असून एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई २४ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास केली.
सूर्यकांत पंडित देवरे (वय-४९ रा. डीन्स रेसिडेन्सी, सुस नांदे रोड, बावधन, पुणे. मूळ रा. खर्डी रेल्वे स्टेशन, ता. शहापूर, जिल्हा ठाणे) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश सिताराम कारोटे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डिन्स रेसिडेन्सी मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी वेश्याव्यवसाय करताना तीन तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी या तीनही तरुणींची सुटका करून आरोपीला अटक केली.
दरम्यान, आरोपीने तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून या ठिकाणी वेश्याव्यवसाय करून घेत होता. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत.