पिंपरी-चिंचवड: आयपीएलच्या सामन्यावर वेगवेगळ्या समाजमाध्यमातून बेटिंग घेणाऱ्या टोळक्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 5 जणांना अटक केली आहे. तसेच बेटिंग घेण्यासाठी वापरण्यात येणारे 18 मोबाईल, 4 लॅपटॉप असा 5 लाख 20 हजार 610 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
अंकुश यशवंत कुशवाह (वय 29 वर्ष, रा. ब्लु रिज सोसायटी, हिंजवडी), विक्रम ललीत झा (वय 25 वर्ष ), विकास गोविंद पारधी (वय 24 वर्ष), आयुष कुमार झा (वय 26 वर्ष), गौरव शिवराम ठेंगरी (वय 26 वर्ष) प्रेमकुमार ईश्वरदास राजवाणी (वय 52 वर्ष, रा. जबलपूर, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच मोहित या साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जण मध्यप्रदेश, हरियाणा , नागपूर अशा विविध राज्यात, शहरात राहणारे असून ते आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेण्यासाठी येथे आले होते. मागील 15 दिवसांपासून ते आयपीएलवर बेटिंग घेत आहेत. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गणेश मेदगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलमध्ये मंगळवारी (22 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होता. तेंव्हा या सामन्यावर बेटिंग घेतले जात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हिंजवडी येथील ब्लु रिज सोसायटीतील फ्लॅटवर रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. छापा टाकला असता फ्लॅटमध्ये 5 जण मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन बेटिंग घेताना आढळून आले.
तसेच दुसर्याच्या नावावरील सिम कार्ड व बँक खाते वापरुन फसवणूक करण्याच्या उद्देशाने “Cricline”, “Cricket live Line”, “CricBuzz” अशा विविध समाजमाध्यमातील अॅपद्वारे क्रिकेटवर बेटिंग घेताना दिसले. त्यांच्याकडून 4 लॅपटॉप व 18 मोबाईल असा एकूण 5 लाख 20 हजार 610 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तपास करीत आहेत.