पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असताना बंगळुरू-मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस हवालदार यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रावेत येथे सोमवारी १५ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेने देहूरोड पोलिस ठाण्यात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. सचिन नरुटे हे देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. तर अपघात झाल्यानंतर चालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, नरुटे या अपघातात गंभीर जखमी झाले होते. तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.