तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परीसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. बिअर शॉपी व्यवस्थित चालु ठेवण्यासाठी, कोणताही त्रास न होण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यातील हवालदाराला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १४) मंत्रा सिटी रोड, तळेगाव दाभाडे येथे केली आहे. सतीश अरुण जाधव (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असं रंगेहाथ पकडलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बिअर शॉपी चालवित असून त्यांच्या मालकीच्या दोन बिअर शॉपी आहेत. दरम्यान, कोणताही त्रास अथवा खोटे गुन्हे दाखल न करता बिअर शॉपी व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी प्रत्येक बिअर शॉपीमागे सहा हजार रुपये असे मिळून दोन बिअर शॉपीचे एकूण १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी सतीश जाधव याने तक्रारदारा यांच्याकडे केली होती. याबाबत तक्रारदार यांनी पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, संबंधित तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, आरोपी सतीश जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच स्विकारल्याने आरोपी सतीश जाधव यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. त्यांचेविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलिसा उपायुक्त/पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रेम वाघमोरे पुढील तपास करत आहेत.