पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पोलीस हे २४ तास ऑनड्युटी राहतात. त्यांच्या प्रकृतीवर अनेकदा त्याचा परिणाम होत असतो. तसेच अनेक आजार देखील उद्भवत असतात. त्यासाठीच अशा सुसज्ज अशा पोलीस दवाखान्याची सुरवात करण्यात आली आहे.
पोलीस म्हणाले की, ताण तणाव हा नक्कीच असतो. भारत हा असा देश आहे, ज्या ठिकाणी सण-उत्सव सर्वात जास्त साजरे केले जातात आणि याच सण- उत्सवात सुरक्षेची जबाबदारी आणि काही अनिश्चित प्रकार घडू नये म्हणून पोलीस हे सैदव तत्पर असतात. यामुळेच ते अनेकदा त्यांच्या कुटुंबासमवेत सण आणि उत्सव देखील साजरे करत नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ते २४ तास कार्यरत राहतात. कामाचा ताण आणि शारीरिक, मानसिक थकवा आल्याने स्वतःकडे देखील लक्ष देण्याची वेळ पोलिसांकडे खूप वेळा नसते. अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. हेच लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाकड परिसरातील कावेरीनगर येथे पोलीस दवाखाना कार्यान्वित करण्यात आला आहे.
या हॉस्पिटलसाठी डॉ. राधाकृष्ण पवार यांचे मोलाचे योगदान लाभलं आहे. वैद्यकीय अधिकारी श्रीमती अनुपमा कांबळे, डॉ. संजय भारती यांच्यासह आठ जणांचा स्टाफ या ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण ४,९२७ महिला आणि पुरुष अधिकारी आणि कर्मचारी कार्यान्वित आहेत. त्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पोलीस दवाखाना सुरू करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.