पिंपरी : आळंदी जवळील चिंबळी येथे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जबरदस्तीने दुचाकी नेली याचा मानसिक धक्का बसल्याने पतीने पत्नीला व्हिडिओ कॉल करीत गळफास घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. माधव हनमंत वाघमारे (वय 32, रा. बर्गवस्ती रोड, चिंबळी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेबाबत त्यांचा भाऊ केशव हनमंत वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून 2022 मध्ये कर्ज घेतले होते. कर्जाच्या हप्त्याची तो नियमित परतफेड करीत होते. 6 जुलै रोजी देखील भाऊ रांजणगाव येथे कामानिमित्त गेला असता तिथे येऊन फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने कर्जाचा हप्ता नेला होता. मात्र 17 जुलै रोजी याच खासगी फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी रांजणगाव येथे गेला आणि तुमचे कर्जाचे तीन हप्ते थकले आहेत. तुम्ही आत्ताच 49 हजार रुपये भरा, असे सागितले तसेच माधव यांना जबर मारहाण करून त्यांची दुचाकी जबरदस्तीने घेऊन गेला. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
दुचाकी नेल्याचा मोठा मानसिक धक्का..
आपली दुचाकी घेऊन गेले असल्याचा मोठा मानसिक धक्का माधव यांना बसला होता. याबाबत त्यांनी वेळोवेळी पत्नी आणि भावाला याबाबत सागितले, रक्षाबंधन व इतर काही कार्यक्रमानिमित्त भाऊ, पत्नी, मुले लातूर येथील आपल्या गावी गेले होते. त्यावेळी माधव यांनी पत्नीला व्हिडिओ कॉल करीत आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. भाऊ व पत्नीने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान भावाने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करून हा प्रभाकर सांगितला. नियंत्रण कक्षाने सांगितल्याप्रमाणे भावाने आळदी पोलिसाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली खरी मात्र पोलीस घरी पोहण्यापूर्वीच माधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती.
आत्महत्येस एजंटच जबाबदार..
आपल्या भावाच्या आत्महत्येला खासगी फायनान्स कंपनीचे वसुली एजंट जबाबदार असल्याचा आरोप मयत माधव यांचे भाऊ केशव यांनी केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.