पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी लिंक रोड, रहाटणी येथे मागील वर्षी झालेल्या वादातून दोघांमध्ये बेदम हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रहाटणी येथे ५ मार्च ला सायंकाळी घडली. पंकज संतोष चोथे (२४, रा. थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पप्या गिरी (३०, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पंकज आणि त्यांचा मित्र श्रवण माचरे यांनी शिफ्टने रिक्षा चालवण्यासाठी घेतली आहे. रिक्षा दुरुस्त करण्यासाठी ते काळेवाडी लिंक रोडवर असलेल्या एका गॅरेजवर गेले. तिथे पप्या त्याच्या दोन मित्रांसह दारू पीत होता. पप्याने पंकज यांना हाक मारून बोलावून घेतले. मागील वर्षी झालेल्या भांडणाच्या रागातून वाद घालून पुन्हा मारहाण केली. पप्या आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादी पंकज यास मारहाण केली. तसेच, फोन करून आणखी साथीदारांना बोलावून घेतल्याचे पंकज यांनी ऐकले
त्यानंतर पप्या आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी पंकज याला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, पंकज यांच्या खिशातील मोबाइल फोन आणि २ हजार १०० रुपये काढून घेतले. तेथे आरडाओरडा करून पप्या आणि त्याचे साथीदार दहशत निर्माण करू लागल्याने आजूबाजूचे लोक तेथून निघून गेले. परस्पर विरोधात गिरीश दीपक मनवे ऊर्फ पप्पू गिरी (२८, रा. साने चौक, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पंकज चोथे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे काळेवाडी लिंक रोडवर असलेल्या एका गॅरेजजवळ थांबले असता पंकज तिथे आला. मागच्या वर्षी मला मारले होते. तुला आठवते का, असे म्हणत त्याने फिर्यादी पप्पू यास शिवीगाळ करून मारहाण केली.