Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या छळाला कंटाळून बहिणीने थेट आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भावाला दिलेले पैसे परत मागितल्याने भावासह त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला, आणि त्याच छळाला कंटाळून बहिणीने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली आहे. सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनीता यांनी आपला भाऊ संदीप याला दोन लाख रुपये उसने दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत भावाने पैसे दिले नसल्याने ते पैसे परत मागण्यासाठी 3 डिसेंबर रोजी सुनिता या भावाच्या घरी गेल्या होत्या. मात्र, पैसे न देता भावाच्या पत्नीने त्यांना शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले.
भावाच्या पत्नीकडून घरी मारहाण झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा पुन्हा सुनिता यांच्या भावाच्या पत्नीने सुनीता यांना त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली. या प्रकरणी 4 डिसेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सुनीता घरकाम करून घरी परत येत असताना त्यांना भाऊ संदीप आणि त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून पुन्हा बेदम मारहाण करून जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. भावाच्या याच छळाला कंटाळून सुनिता यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांचे पती रामेश्वर यांनी पोलिसांत दिली.