पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना येत्या गुरुवारी पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलशुद्धीकरण आणि वितरण व्यवस्थेतील देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

महापालिकेच्या नियोजनानुसार, गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 मधील जलशुद्धीकरण केंद्राशी संबंधित यंत्रणेवर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामध्ये स्थापत्य विभागासह विद्युत यंत्रणेची देखभाल आणि आवश्यक तांत्रिक कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी गुरुवारी शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, नागरिकांची अडचण केवळ गुरुवारपुरती मर्यादित राहण्याची शक्यता नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागू शकतो. तसेच काही भागांमध्ये पाणी कमी दाबाने येण्याची किंवा पुरवठा अनियमित राहण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा.तसेच शुक्रवारी पुरवठा पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.







