पिंपरी, (पुणे) : मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडण्याचा विक्रम केला आहे.अशातच आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांनी विक्रीच्या प्रयत्नांत असलेले दोन कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी १ मार्च पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपळे निलख परिसरात करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख परीसारतील रक्षक चौकाजवळ एक व्यक्ती एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नमामी झा याला ताब्यात घेतले. आरोपीकडून पोलिसांनी तब्बल २ कोटी २ लाख १० हजार रुपये किमतीचे दोन किलो २० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल आहे. हे ड्रग्स आरोपीने विक्रीसाठी आणले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून अधिक पोलीस करत आहेत.