पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीला पकडण्यात अखेर पिंपरी चिंचवड पोलिसां यश आलं आहे. या टोळीकडून पोलिसांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह पिस्तूल, काडतुसे असा १७ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी आणि जबरी चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असताना कुरळी या गावात सुशील उर्फ बारक्या भरत गोरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारासह एका घरात देशी पिस्टल सोबत लपून बसला आहे, अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या दरोडा विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सुशील उर्फ बारक्या गोरे, अक्षय प्रभाकर कणसे, आणि त्याचे दोन अल्पवयीन गुन्हेगार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यातील चारही संशयितांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जबरी चोरी, घरफोडी मारामारी असे विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून दोन लाख दोन हजार रूपये किमतीचे चार देशी पिस्टल, चार काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या, दहा लाख 75 हजार किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि चार लाख 85 हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल असा ऐकून 17 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.