पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने (Pimpri-Chinchwad Police) गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अभिनव आणि प्रभावी शस्त्रविरोधी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत 19 जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत पोलिसांनी तब्बल 263 पिस्तूल, 363 जिवंत काडतुसे आणि 679 विविध घातक शस्त्रे जप्त केली आहेत. या मोठ्या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राज्यात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.

स्पर्धात्मक गुणांकन पद्धत
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक पोलीस पथकामध्ये स्पर्धा निर्माण करण्यासाठी गुणांकन पद्धतीचा वापर करण्यात आला. तलवारी, कोयते किंवा सुरा यांसारखे एक शस्त्र जप्त केल्यास 1 गुण, तर पिस्तूल जप्त केल्यास 10 गुण देण्यात आले. यामुळे प्रत्येक पथकाने पिस्तूल जप्त करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले, परिणामी मोठ्या प्रमाणात अवैध पिस्तूल आणि काडतुसे पोलिसांच्या हाती लागली. ही पद्धत राज्यात इतर कोणत्याही आयुक्तालयाने वापरलेली नाही, त्यामुळे या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या मोहिमेमुळे शहरात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांना आळा बसला आहे. शस्त्रसाठ्याचा पुरवठा खंडित झाल्यामुळे अशा घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. एकंदरीत, शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात या मोहिमेचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे.







